शेतक-यांनी अर्ज दया, कर्ज घ्या या योजनेतंर्गत नवीन पिक कर्ज घेण्यासाठी अर्ज करावा – जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांचे आवाहन
* शेतक-यांना नवीन पिक कर्ज घेतांना येणा-या अडचणी सोडविण्यासाठी दर शुक्रवारी मंडळनिहाय कर्ज मागणी मेळाव्याचे आयोजन
* शेतक-यांना पिक कर्ज देण्याबाबत टाळाटाळ करतील अशा बँका विरूध्द कडक कार्यवाही
*पिक कर्ज वाटपाचे लक्षांक पुर्ण न करू शकणा-या बँकाना ब्लॅक लिस्टमध्ये टाकणार
*ॲक्सीस बँक मधील 45 कोटी रूपयांचे शासकीय ठेवी काढून केली कार्यवाही
*शेतक-यांना पिक कर्जासाठी येणा-या अडचणीसाठी टोल फ्री क्रमांक 1077 संपर्क साधावा
अकोला, दि. 12:- जिल्हयातील 1 लक्ष 15 हजार शेतक-यांना 486 कोटी रूपयांची कर्ज माफीचा लाभ मिळाला आहे. अशा शेतक-यांनी अर्ज दया, कर्ज घ्या या योजनेतंर्गत नवीन पिक कर्ज घेण्यासाठी अर्ज करावा असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केलेले आहे. शेतकरी व नवीन खातेदार शेतक-यांना त्वरीत नवीन पिक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सर्व बॅंकांना निर्देश देण्यात आलेले आहे.
शेतक-यांना नवीन पिक कर्ज घेतांना येणा-या अडचणी दुर करण्यासाठी दर शुक्रवारी 15 जुलै पर्यंत मंडलनिहाय कर्ज मागणी मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.तसेच अर्ज दया व कर्ज घ्या या योजनेतंर्गत पिक कर्ज घेण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.
ज्या बँका शेतक-यांना त्वरीत कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी अडचण निर्माण करतील. किंवा पिक कर्ज देण्याबाबत टाळाटाळ करतील अशा बँका विरूध्द कार्यवाही करण्यात येईल. ज्या बँका शेतक-यांना पिक कर्ज वाटपाबाबतचा लक्षांक पुर्ण करू शकणार नाही. अशा कमी लक्षांक असलेल्या तीन बँकाना ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्यात येईल. व अशा बँकामध्ये कोणत्याही शासकीय ठेवी ठेवण्यात येणार नाही. किंवा असलेल्या शासकीय ठेवी काढुन घेण्याची कार्यवाही करण्यात येईल. असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिलेत.
शेतक-यांच्या पिक कर्ज देण्याबाबत अडथळा निर्माण करणा-या व टाळाटाळ करणा-या ॲक्सीस बँक विरूध्द जिल्हा प्रशासनाने कार्यवाही केली असून 45 कोटी रूपयाच्या शासकीय ठेवी या बँकेतून काढून घेण्यात आलेल्या आहेत. अशा प्रकारची कडक कार्यवाही शेतक-यांना पिक कर्ज वाटपामध्ये अडचणी निर्माण करणा-या किंवा टाळाटाळ करणा-या बँकावर कार्यवाही करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिली.
शेतक-यांना नवीन पिक कर्ज घेतांना येणा-या अडचणीवर मार्गदर्शन करण्यासाठी नैसर्गिक आपत्ती विभाग जिल्हाधिकारी कार्यालय येथील टोल फ्री क्रमांक 1077 देण्यात आला आहे. तसेच शेतक-यांना मार्गदर्शन करण्यासाठी नवीन पिक कर्ज वाटपासंबधी संपुर्ण माहिती असलेल्या बँक कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
Also read : तेल्हारा पोलिसांची धडक कारवाई गोमांस सह टाटा सुमो जप्त